आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘देऊळबंद-२’च्या यशस्वी टीमचा ‘सूर्यदत्त’कडून गौरव

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 4, 2026
Spread the love

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत गाजत असलेल्या ‘देऊळबंद-२’ या चित्रपटाच्या यशस्वी टीमचा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या वतीने गौरव करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेत्री स्नेहल तरडे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे आणि निर्माते कैलास वाणी यांना ‘सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथील सिटीप्राईड चित्रपटगृहात ‘देऊळबंद-२’ चित्रपटाचा विशेष विनामूल्य शो आयोजित करण्यात आला.

यावेळी चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी व जुईली वाणी, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, चित्रपटातील कलाकार, तांत्रिक टीम, सूर्यदत्तचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात कलाकारांचा सत्कार करून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, विद्यावाचस्पती विद्यानंद, वरिष्ठ पत्रकार किरण जोशी, माध्यम सल्लागार जीवराज चोले आदी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्यांसारख्या ज्वलंत विषयावर आधारित ‘देऊळबंद-२’ या चित्रपटाला प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

श्रद्धा, संस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक मूल्ये यांची प्रभावी मांडणी करत या चित्रपटाने मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही दिला आहे.

प्रभावी कथा, दमदार संवाद, वास्तववादी अभिनय आणि दर्जेदार तांत्रिक सादरीकरणामुळे हा चित्रपट सर्व स्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

प्रवीण तरडे म्हणाले, “महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांनी ‘देऊळबंद-२’ला भरभरून प्रेम दिले. हा सन्मान माझा किंवा स्नेहलचा नसून संपूर्ण चित्रपटाच्या टीमचा आहे.

प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. ‘देऊळबंद-२’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘माईलस्टोन’ ठरेल, असा मला विश्वास आहे.

या चित्रपटाच्या कमाईतून मिळणारा संपूर्ण नफा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.”

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान केले जातात.

त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाचा ‘सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांना प्रदान करण्यात आल्याचे सुषमा चोरडिया यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. मनीषा कुंभार, संचालिका, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि स्वप्नाली कोगजे, हेड ऑफ पीआर, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांनी केले.