हातभट्टीची दारू विकणाऱ्या महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश : कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरात विषारी दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी हातभट्टीच्या दारूविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने सिंहगड रोड परिसरातील हातभट्टीची दारू विकणाऱ्या एका महिलेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तिला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
उषा संतोष सकट (वय ३०, रा. निवृत्तीनगर, वडगाव) असे या महिलेचे नाव आहे. उषा सकट हिच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच तिला तडीपारही करण्यात आले होते. मात्र, तरीही तिने बेकायदेशीर दारू विक्रीची साखळी सुरूच ठेवली होती. वडगाव परिसरात तिची दहशत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर, पोलीस हवालदार पंकज देशमुख, अरविंद धावडे आणि अश्विनी त्रिभुवन यांनी पुरावे गोळा करून तिच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार केला.
पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला.
प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी उषा सकट हिला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. सिंहगड रोड पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करून तिला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
