पुणे ते स्पिती व्हॅली बाईक मोहीम यशस्वी
तब्बल ६,१०० किमींचा प्रवास : ५१ वर्षीय शिल्पा काळे यांचे धाडस ठरले प्रेरणादायी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील पाच जणांच्या बाईकस्वार पथकाने पुणे ते स्पिती व्हॅली आणि पुन्हा पुणे असा तब्बल ६,१०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या १३ दिवसांत यशस्वीपणे पूर्ण केला.
हिमाचल प्रदेशातील खडतर घाटरस्ते, वॉटर क्रॉसिंग, बर्फवृष्टी, भूस्खलनाचा धोका, वाहनांचे तांत्रिक बिघाड आणि ऑक्सिजनची कमतरता अशा अनेक आव्हानांवर मात करत थरारक अनुभव घेत या पथकाने स्पिती व्हॅली यशस्वीपणे गाठली.
विशेष म्हणजे, ५१ वर्षीय शिल्पा निलेश काळे यांनी ही मोहीम दुचाकीवरून पूर्ण करत महिलांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.
या मोहिमेत नितीन डुंबरे, सोमवीर फड, शांताराम गायकर आणि संजय पवार यांनी सहभाग घेतला. स्पितीतील काझा, की मोनेस्ट्री, चिंचम ब्रिज, हिक्कीम, कोमिक, लांगझा, नाको, ताबो, तसेच कुंजुम पास, चंद्रताल आणि मनाली या प्रमुख पर्यटनस्थळांना त्यांनी भेट दिली.
प्रवासादरम्यान ब्रेक निकामी होणे, टायर कापला जाणे, पंक्चर, वाहन बिघाड, उंचावरील भागातील आरोग्यविषयक अडचणी अशा अडचणींन पथकाने धैर्याने तोंड दिले.
या मोहिमेचा संपूर्ण खर्च रेनबो हाऊसिंगने प्रायोजित केला. संस्थापक सुनील नहार, सचिन नहार आणि डॉ. श्रुती नहार यांनी या साहसी उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
