जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद
डोक्यात दगड मारून जबरदस्तीने लुटले : कोंढवा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तरुणाला अडवून धक्का देत खाली पाडले आणि त्याच्या खिशातील पैसे काढून घेत असताना विरोध केल्याने डोक्यात दगड मारून लुटणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
फरान वसीम शेख (वय २१, रा. भगवा चौक, कोंढवा) आणि फरमान अस्लम मलिक (वय १९, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना २८ जून रोजी ज्योती चौकालगतच्या मोकळ्या मैदानात घडली होती. फिर्यादी यांना दोन्ही आरोपींनी अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि त्यांच्या खिशातील पाकिटातील पैसे काढून घेत असताना फिर्यादी यांनी विरोध केला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड मारून पाकिटातील ४ हजार ७०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले.
गुन्हा घडल्यानंतर पोलीस अंमलदार राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण आणि शाहिद रजपुत यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवनेरीनगर येथील गल्ली क्रमांक १४ मध्ये शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच, गुन्ह्यात चोरीस गेलेली रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार रवींद्र चिप्पा, अमोल हिरवे, राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद रजपुत, केशव हिरवे, संतोष बनसोडे, सूरज शुक्ला, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, रशिद शेख आणि ओंकार शेटे यांनी केली.
