सामाजिक उपक्रमांच्या घोषणांनी विजय भंडारींचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या जगण्यात सामाजिक दायित्व असणे आवश्यक आहे. हेच सामाजिक दायित्व जपत जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष व लायन्स क्लब ऑफ पुणेचे माजी प्रांतपाल विजय भंडारी यांचा ५९ वा वाढदिवस 4 जुलैरोजी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून भंडारी यांना शुभेच्छा दिल्या.
जीतो, लायन्स क्लब, युगल धर्म संघ, आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आदी संस्थांच्या माध्यमातून विजय भंडारी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी या विविध संस्थांचे मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये जीतो अॅपेक्सचे माजी चेअरमन गणपत चौधरी, हिमांशु शाह, जीतो अॅपेक्सची कार्यकारिणी, विजयकांत कोठारी, अॅड. एस. के. जैन, राजेश साकला, इंदर जैन, रवींद्र साकला, कृष्णकुमार गोयल, राजेश शहा, राजेंद्र बाठिया, इंदर छाजेड, मनोज छाजेड, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, चेतन भंडारी, डॉ. प्रदीप बाफना, राहुल सांकला, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया, जिनेंद्र लोढा, गोपालकृष्ण अग्रवाल, विकास अग्रवाल, सचिन जैन, राजेंद्र गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्त द्वारका जालान व संदीप पंचवाटकर यांचा ‘जीना इसी का नाम है’ हा संगीतमय कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. विजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने रास्ता पेठेतील समर्थ हॉस्पिटलला सीटी स्कॅन मशीन भेट देण्यात आली.
याबरोबरच आशापुरा माता मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने १०० विद्यार्थ्यांना २१ लाख रुपयांची शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजूंसाठी १० शिवणयंत्रांचे वाटप, किरकोळ विक्रेत्यांना छत्र्यांचे वितरण, ३०० हेल्मेटचे वितरण, ई-वेस्ट कलेक्शन सेंटरची स्थापना, ५०० झाडांचे वृक्षारोपण, वर्षभरात दहा आरोग्य शिबिरे, मुकबधिर विद्यालयाला मदत तसेच शाळांमध्ये नर्सरीसाठी ग्रंथालय उभारणी अशा विविध सामाजिक उपक्रमांची पुढील वर्षभरासाठी घोषणा करण्यात आली.
सामाजिक कार्यात योगदान देता आले, याचा आनंद – उद्योग-व्यापारातून योग्य मार्गाने पैसा कमावून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे हे आपले पहिले कर्तव्य असते. कुटुंबाप्रतीचे कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर आपण समाजासाठी काम करणे अपेक्षित असते. आईच्या सांगण्यावरून मी सामाजिक क्षेत्रात आलो. पत्नी भारती, बंधू चेतन आणि संपूर्ण कुटुंबाने साथ दिल्यामुळे मला जमेल तेवढे सामाजिक कार्य करता आले. यासाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभला. यापुढेही समाजसेवेलाच प्राधान्य राहील. – विजय भंडारी, राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अपेक्स
