आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरड कोसळल्याने बोरघाट बंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 6, 2026
Spread the love

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरघाटातील मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. तसेच रेल्वे मार्गावरील मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे – मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेने पुणे – मुंबई दरम्यानच्या १६ रेल्वेगाड्या रद्द केल्या असून ६ गाड्यांचा मार्ग वळविला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली आहे.

पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवरील खंडाळा एक्झिट येथे दरड कोसळली आहे. तसेच मिसिंग लिंकमधील बोगद्यात वरून मोठ्या प्रमाणावर पाणी व माती येत असल्याने हा मार्गही बंद करण्यात आला आहे.

मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावरही दरड कोसळली आहे. त्यामुळे पुणे – मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद पडली आहे. अनेक रेल्वेगाड्या वाटेत थांबविण्यात आल्या आहेत.

काही गाड्या कल्याण – इगतपुरी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, कोकण आणि पुणे परिसरासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकमधील बोगद्यात वरून मोठ्या प्रमाणावर पाणी पडत आहे. त्यामुळे पहाटेपासून एक्सप्रेसवे दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. तसेच जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी आल्याने हा महामार्गही बंद करण्यात आला आहे.

रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, पुणे – मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई – धुळे एक्सप्रेस तसेच मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.