आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पावसाच्या धुवांधार बॅटिंगमुळे पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 6, 2026
Spread the love

पुणे : संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ लावली होती. ही सर्व कसर जुलै महिन्यात भरून काढण्याचा निर्धार पावसाने केल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने शतकी खेळी केली, तर चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांची काहीशी तारांबळ उडाली असली, तरी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी सकाळी अवघ्या ३ तासांत, म्हणजे सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत, चिंचवडमध्ये ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुण्यात ८ मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतरही पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात एका दिवसात ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असून, सोमवारी सकाळी खडकवासला धरण प्रकल्पात २३.७८ टक्के, म्हणजेच एकूण ६.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याचवेळी पवना धरणात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

चिंचवड येथे गेल्या २४ तासांत विक्रमी २०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी चिंचवडमध्ये २५ सप्टेंबर २०२४ रोजी १२७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

पुणे शहरात १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात २५ सप्टेंबर २०२४ रोजी १३१ मिमी, तर १९ जुलै १९५८ रोजी एका दिवसात १३० मिमी पाऊस पडला होता.

तसेच भोर – १७२ मिमी, पाषाण – ११३ मिमी, दुदुळगाव – ११० मिमी, शिवाजीनगर – १०८ मिमी, निमगिरी – ९९ मिमी, राजगुरुनगर – ९५ मिमी, दापोडी – ९३ मिमी, माळीण – ८३ मिमी, शिरूर – ७४ मिमी, दौंड – ४५ मिमी आणि बारामती – १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण प्रकल्प परिसरात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला. टेमघर – २१५ मिमी, वरसगाव – ११२ मिमी, पानशेत – ११५ मिमी, खडकवासला – ४१ मिमी, पवना – ३४२ मिमी, आंद्रा – १९५ मिमी, मुळशी – २३० मिमी, कळमोडी – १३६ मिमी, चासकमान – १६७ मिमी, भामा आसखेड – ११२ मिमी, निरा देवघर – १५२ मिमी आणि गुंजवणी – ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात एकूण २३.७८ टक्के पाणीसाठा झाला असून, एकूण ६.९३ टीएमसी पाणी साठले आहे. पवना धरणात ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.