आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ अभियानाला वेग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 6, 2026
Spread the love

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारी २०२६च्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकरी-भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे.‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, आनंदी वारी’ या संकल्पनेअंतर्गत चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटाची विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, वाळवंटाच्या देखभालीसाठी स्वतंत्र ५० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी आषाढी वारीपूर्वी तीन दिवस चंद्रभागा नदीपात्रात पोहोचेल, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली.

पालकमंत्री गोरे यांनी रविवारी चंद्रभागा नदीपात्र, वाळवंट तसेच वारीसाठी सुरू असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

वारीपूर्वी करण्यात आलेल्या स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत ही मोहीम केवळ वारीपूर्वीच नव्हे, तर संपूर्ण यात्रा कालावधीत आणि भाविकांची गर्दी संपेपर्यंत अखंड सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

नदीपात्राच्या दोन्ही बाजूंवरील झुडपे, राडारोडा आणि कचरा हटवून परिसराचे सपाटीकरण करण्यात येत आहे. नदीपात्रात प्लास्टिक व इतर कचरा टाकला जाणार नाही, यासाठी मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात येत असून, वाळवंटाच्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

सध्या यांच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त सफाई कर्मचारीही या विशेष मोहिमेत कार्यरत आहेत. आषाढी वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, वारीपूर्वी तीन दिवस चंद्रभागा नदीपात्रात पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३० ते ३२ लाख वारकरी व भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

वारकऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असून ती पुढेही कायम राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

भाविकांच्या सुविधेसाठी चंद्रभागा वाळवंटात चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, तात्पुरती शौचालये, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच नवीन दर्शन मंडपाचे काम सुरू असून, जनक महाराज अपशिंगेकर यांच्या जागेवर मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेसाठी नव्याने शेड उभारण्यात आली आहे.

या ठिकाणी भाविकांसाठी सुलभ शौचालये, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त (नगरपालिका प्रशासन) आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.