श्री डेव्हलपर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल
जमिनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष : सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जमिनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून जमिनीचे खरेदीखत करून न देता फसवणूक करणाऱ्या श्री डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुलक्षणा प्रमोद भोसले (वय ५०, रा. कंट्रीवुड सोसायटी, टिळेकरनगर, कोंढवा), राजेश केशवराव देशमुख (वय ५५, रा. नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर) आणि सारिका पोळ (वय ४०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत स्मिता संजय उपरे (वय ५८, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार धनकवडीतील काशिनाथ पाटीलनगर येथील विशाल टॉवरमधील कार्यालय व के. के. मार्केटमधील कार्यालयात नोव्हेंबर २०२२ ते १८ जून २०२६ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी श्री डेव्हलपर्स कंपनीच्या वतीने जमिनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून वेळोवेळी २४ लाख रुपये घेतले.
त्यानंतर त्यांना कोणताही परतावा दिला नाही. तसेच जमिनीचे खरेदीखत करूनही दिले नाही. स्वतःचे फोन बंद करून जमीन खरेदीसाठी गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेले पैसे आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरले.
गुंतवणूकदारांची गुंतवलेली रक्कम परत न करता तिचा अपहार करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.
