आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पदभार घेताच अजित लकडे यांचा दणका : २४ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 6, 2026
Spread the love

सोलापूर : सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईदरम्यान जबरी चोरीसह एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून ₹ 45,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 30 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील रामवाडी सिमेंट गोडाऊनजवळील तिकीट काऊंटर येथे फिर्यादी स्वप्निल सुभाष उपळकर (वय 35, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) यांना तीन अनोळखी इसमांनी अडविले.

आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रिअलमी कंपनीचा सुमारे ₹ 10 हजार किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला तसेच धमकावून खिशातील ₹ 6 हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 539/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 309(2), 309(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम प्रकाश गायकवाड (वय 20, रा. पटवर्धन चाळ, वांगी रोड, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले.

कसून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान समीर अकबर पटेल (वय 21, रा. थोरली इराण्णा वस्ती, सोलापूर) व नैतिक वसंत जाधव (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) यांची नावे निष्पन्न झाली.

यापैकी समीर पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून नैतिक जाधव हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत आरोपींकडून ₹ 5,500 रोख रक्कम व सुमारे ₹ 40 हजार किमतीचा मोबाईल फोन, असा एकूण ₹ 45,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच आरोपींकडून जबरी चोरीसह एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात सदर बझार पोलिसांना यश आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रितम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-2) विजयालक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत तसेच सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.