आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘नमोमी चंद्रभागा’ अभियानाला प्रशासनाचा भक्कम हातभार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 6, 2026
Spread the love

पंढरपूर ( सोलापूर) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ‘नमोमी चंद्रभागा’ अभियानांतर्गत चंद्रभागा नदीच्या वाळवंटात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगले , तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या उपस्थितीत प्रशासन, पोलीस यंत्रणा, पंढरपूर नगर परिषद, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, सफाई कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच समाजसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.

स्वच्छता मोहिमेदरम्यान चंद्रभागा वाळवंट परिसरातील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कागद, थर्माकोल तसेच इतर टाकाऊ वस्तू संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, नगर परिषदेचे सफाई कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांनी एकत्रितपणे चंद्रभागा वाळवंट स्वच्छ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमामुळे वारकरी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली. याप्रसंगी नागरिक, वारकरी आणि भाविकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, कचरा कचरापेटीतच टाकावा तसेच ‘स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारी, स्वच्छ चंद्रभागा’ या संकल्पनेला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

प्रशासन, पोलीस यंत्रणा, पंढरपूर नगर परिषद, विविध शासकीय विभाग, सफाई कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच समाजसेवक यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे चंद्रभागा नदीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.

आषाढी वारीदरम्यान स्वच्छ, सुंदर आणि निर्मल चंद्रभागा राखण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.