माजी पोलीस महासंचालक के. के. कश्यप यांचे निधन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक कमल कृष्ण कश्यप (के. के. कश्यप) यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कश्यप यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १ वाजता येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
के. के. कश्यप यांचा जन्म १२ एप्रिल १९४५ रोजी झाला. ते १९६९ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. नाशिकचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी नोव्हेंबर १९९० मध्ये कार्यभार स्वीकारला होता.
त्यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
२००४ मध्ये ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी रिलायन्स एडीए ग्रुपमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून काम केले. के. के. कश्यप हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस त्यांनी संपूर्ण सेवाकाळात कायम राखला होता. पुण्यातील वाहतूक समस्या तेव्हाही शहरातील एक महत्त्वाचा प्रश्न होती.
त्या काळात ते स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधत असत. पोलिसांच्या कामात इतरांचा हस्तक्षेप होण्यास त्यांचा नेहमीच विरोध असे.
