आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पालखी सोहळ्यात यंदा ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 8, 2026
Spread the love

पुणे : प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन गुरुवारी (९ जुलै) शहरात होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी सात हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. यंदा पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, फेस रेकग्निशन कॅमेरे तसेच अ‍ॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, संजय पाटील आणि तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, पालखी मार्ग तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

पालखी सोहळा सुरक्षित पार पडावा, यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, फेस रेकग्निशन कॅमेरे तसेच अ‍ॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यातील प्रत्येक घडामोडींवर या कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, हे कॅमेरे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक आणि गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन गुरुवारी बोपखेल येथे होईल. विश्रांतवाडीमार्गे पालखी शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ, लक्ष्मी रस्तामार्गे श्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी जाईल.

श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुना मुंबई-पुणे रस्तामार्गे शहरात दाखल होईल. नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात पालखी मुक्कामी असेल.

पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दागिने हिसकावणे, मोबाईल चोरीसारख्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत.

चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पालखी मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मुक्कामी दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच शीघ्र कृती दलाची (क्यूआरटी) पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्याच्या आगमनाबाबत माहिती देण्यासाठी यंदाही पोलिसांकडून समाजमाध्यमांवर लाईव्ह लोकेशनची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पालखी मार्ग तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन व प्रस्थान सुरळीत पार पडावे, यादृष्टीने पालखी सोहळ्याचे प्रमुख, विश्वस्त आणि दिंडी प्रमुख यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले.