शिष्यवृत्तीत सुलाखे हायस्कूल बार्शीची यशस्वी घोडदौड
गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनंत कवठाळे हे होते. यावेळी प्रशालेचे प्राचार्य रामकृष्ण इंगळे व उपमुख्याध्यापक श्री प्रसन्न देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभात पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेले राजदीप इंगळे, अनुराग घाटे व स्वराली फोपले, तसेच पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेतील अथर्व गव्हाणे व ज्ञानदा घुटे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सूर्यकांत चोरमले, वनिता लटके व दिनेश बनसोडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात अनंत कवठाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “ज्ञान हे केवळ गुण मिळविण्यासाठी नसून जीवन समृद्ध करण्यासाठी असते,” असे सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या तर्कशक्तीची पडताळणी करत जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचा संदेश दिला. प्राचार्य रामकृष्ण इंगळे यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून गुणवंत बनण्याबरोबरच सुसंस्कृत नागरिक होण्याचे आवाहन केले.
अपयश आले तरी खचून न जाता उच्च ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न करण्याचा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ गणित शिक्षक सूर्यकांत चोरमले यांनी केले, तर दिनेश बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केले.
