ताम्हिणी ५२५, लोणावळा २७९, भिरा ५७४ मिमी पाऊस
लोणावळा परिसरात सर्वत्र अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला महापूर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आळंदीमधून बुधवारी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्याचवेळी लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या महापुराचे सावट पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावर पडले आहे. राज्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांना आळंदीत पोहोचणे कठीण झाले आहे.
लोणावळा येथे गेल्या २४ तासांत २७९ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत तेथे एकूण २,५३९ मिमी पाऊस झाला आहे. ताम्हिणी येथे ५२५ मिमी पाऊस पडला असून, आतापर्यंत २,९३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भिरा येथे ५७४ मिमी पाऊस झाला असून, तेथे आतापर्यंत ३,९९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
याशिवाय दावडी – ४८८, डोंगरवाडी – ३६५, मुळशी – ३०४, शिरगाव – ४५०, कोयना (नवजा) – २७६, वळवण – २०७, खोपोली – १९६ आणि आंबोणे – ३१८ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस – पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत माळीण येथे १५६ मिमी, भोर – १००, चिंचवड – ९९, पाषाण – ९४, शिवाजीनगर – ८४, राजगुरुनगर – ८३, शिरूर – ७२, डुडुळगाव – ६०, दापोडी – ५५, लोणी काळभोर – ३५, बारामती – १७ आणि दौंड – १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उजनी धरण आले प्लसमध्ये – उजनी धरणातील पाणीसाठा यापूर्वी उणे २९ टक्के होता. उजनी परिसरात आतापर्यंत केवळ ८४ मिमी पाऊस झाला असला, तरी घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे उजनी धरणातील उणे पाणीसाठा भरून निघाला असून धरण प्लसमध्ये आले आहे. ७ जुलै रोजी उजनी धरणातील पाणीसाठा उणे २० टक्के होता. त्यानंतर ८ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाल्याने धरणातील उणे पाणीसाठा भरून निघाला असून सध्या धरणात ४.९० टक्के पाणीसाठा झाला आहे. अवघ्या एका दिवसात १३.४६ टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणाच्या साठ्यात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि सोलापूर शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
