आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणांना लुबाडणारे दोन पोलीस अंमलदार निलंबित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 8, 2026
Spread the love

पुणे : लक्ष्मी रोडवरील विजय मारुती चौकात नाकाबंदी सुरू असताना रस्त्याने जाणाऱ्या तिघा तरुणांना अडवून अटकेची भीती दाखवत त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस अंमलदारांना पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी निलंबित केले आहे.

राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक शैलेश पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही पोलीस अंमलदारांची नावे असून, ते फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

राहुल दाभाडे हा सीआर मोबाईल चालक आहे. राहुल दाभाडे आणि विवेक पाटील या दोघांना २९ जून रोजी रात्री शुक्रवार पेठ पोलीस चौकी येथे मदनीस म्हणून रात्रीची ड्युटी देण्यात आली होती.

त्यांची लक्ष्मी रोडवरील विजय मारुती चौकात रात्री ९ वाजल्यापासून नाकाबंदीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास बुधवार पेठेतील एटीएम गल्लीतून पायी जात असलेल्या तिघा तरुणांना त्यांनी अडवून, “तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तुम्हाला न्यायालयात जावे लागेल,” अशी भीती दाखवली.

त्यानंतर एका महिलेच्या क्यूआर कोडवर २ हजार रुपयांची खंडणी स्वीकारली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांचा शोध घेऊन त्यांचा जबाब नोंदवला.

त्यांनी फिर्याद दिल्यानंतर दोन्ही पोलीस अंमलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दलाची जनमानसातील प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याच्या कारणावरून पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दोघांना निलंबित केले आहे.