आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

५ महामार्ग पोलीस वॉर्डनना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 8, 2026
Spread the love

पुणे : पुणे–मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण प्रशासन अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत असताना, त्याचवेळी लोणावळ्याकडे जाणाऱ्या एका कारचालकाला अडवून त्याच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कामशेत पोलिसांनी महामार्ग पोलीस दलातील पाच पोलीस व एका वॉर्डनविरुद्ध गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

पोलीस नाईक (चालक) अमोल वाईकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नन्नवरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार धावरे, वॉर्डन किसन बोंबले, नितेश चव्हाण आणि तुषार घाडगे अशी आरोपींची नावे असून, सहा आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत भूषित उमेश शर्मा (वय २८, रा. संजय पार्क, विमाननगर) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते त्यांचे मित्र मोहम्मद आझमी (वय २८), त्यांची पत्नी फायझा जमील (वय २७) आणि मित्राचा मेव्हणा सय्यद जबेर अहमद (वय ३१, सर्व रा. संभाजीनगर) यांच्यासह ६ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास लोणावळ्याला फिरण्यासाठी पुण्याहून निघाले होते.

तळेगाव पार करून कामशेतजवळील बोगदा ओलांडल्यानंतर अंबर दिवा असलेल्या झायलो वाहनातील सहा जणांनी त्यांच्या कारला ओव्हरटेक करून थांबवण्यास भाग पाडले.

त्यानंतर पोलिसांनी, “तुझ्या कारमध्ये गांजा व ड्रग्ज आहेत. तपासणी केली तर तुझ्यावर कारवाई होईल आणि तुला जेलमध्ये जावे लागेल,” असे सांगून शिवीगाळ केली.

फिर्यादींनी कारमध्ये कोणतेही अमली पदार्थ नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांच्या मित्राची झडती घेतली. त्याच्या खिशात सिगारेटचे पाकीट सापडल्यानंतर त्याचा फोटो काढून कारवाई करण्याची धमकी दिली.

त्यानंतर ५ लाख रुपये दिल्यास कारवाई न करता सोडून देऊ, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दोन पोलीस फिर्यादींच्या कारमध्ये बसले आणि कार तळेगावच्या दिशेने वळवून एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले.

मात्र, फिर्यादींनी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच कारमध्ये बसलेले दोन्ही पोलीस उतरून झायलो वाहनात बसले आणि तेथून पसार झाले.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फिर्यादींनी कामशेत पोलीस ठाण्यात खंडणीची फिर्याद दिली. तपासादरम्यान कामशेत पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन पाच जणांना अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.