मोशीत भीषण दुर्घटना : कचऱ्याचा डोंगर कोसळला
23 जण अडकल्याची शक्यता, 14 जणांची सुटका, 9 जणांचा शोध सुरू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. अनेक वर्षांपासून साचलेल्या ‘लेगसी वेस्ट’च्या प्रचंड ढिगाऱ्याचा भाग मुसळधार पावसामुळे अचानक घसरला आणि अवघ्या काही क्षणांत तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.
घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे 23 कर्मचारी अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यापैकी 5 जणांनी स्वतःची सुटका केली, तर एनडीआरएफ, भारतीय लष्कर, अग्निशमन दल, पोलीस आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त पथकांनी रात्रभर सुरू ठेवलेल्या बचाव मोहिमेत आणखी 9 जणांना सुखरूप बाहेर काढले.
एकूण 14 जणांची सुटका झाली असून उर्वरित 9 जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे चित्र पाहायला मिळाले. आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ, अश्रू आणि प्रार्थना सुरू होत्या.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना जिवंत बाहेर काढण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने बचाव पथके अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने अविरत प्रयत्न करत आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्राथमिक माहितीनुसार, सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पाणी साचून तो सैल झाला आणि दरडीप्रमाणे इमारतीवर कोसळल्याचे सांगितले.
दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या मोशीतील बचावकारवाईकडे लागले असून, अडकलेले सर्व कर्मचारी सुखरूप बाहेर यावेत, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
