ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक
आंबेगाव, येवलेवाडीतील घटना : सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची १३ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी आंबेगाव आणि येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी सायबर चोरट्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून, ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत त्याला जाळ्यात ओढले.
त्यानंतर तक्रारदाराला विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात ४ लाख ८२ हजार रुपये जमा केले.
मात्र, पैसे जमा केल्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचीही अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी ८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी संबंधित महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक शरद कारंडे पुढील तपास करत आहेत.
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी – बँक खाते अद्ययावत (KYC) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून, बँकेकडून केवायसीसाठी ग्राहकांची माहिती अद्ययावत केली जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीचा मोबाईल हॅक करून त्यावरील तांत्रिक ताबा मिळवला. त्यानंतर खात्यातून पावणेतीन लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली.
