आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फ्लॅटमध्ये चूल पेटवल्याने आग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 9, 2026
Spread the love

पुणे : फ्लॅटमध्ये चूल पेटवत असताना सोसायटीतील रहिवाशांनी वारंवार समजावूनही संबंधिताने त्याकडे दुर्लक्ष केले. चूल पेटवल्यानंतर आगीचा भडका उडून फ्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारील आणि वरच्या मजल्यावरील फ्लॅटलाही आगीची झळ बसून मोठे नुकसान झाले. ही घटना धनकवडीतील राज टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी (८ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी हेमा किरण गुजर (वय ४७, रा. राज टॉवर, मुंगळे अण्णानगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालक सुहास बबन गायकवाड (वय ४८, रा. राज टॉवर, मुंगळे अण्णानगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास गायकवाड हा घरात एकटाच राहतो. त्याचा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर असून तो घरात चूल पेटवत होता.

त्यासाठी त्याने घरात लाकूडफाटा साठवून ठेवला होता. फिर्यादी हेमा गुजर या त्याच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहतात. फ्लॅटमध्ये चूल पेटविणे धोकादायक असल्याचे सोसायटीतील अनेक रहिवाशांनी त्याला वारंवार सांगितले होते.

मात्र, बुधवारी सकाळी त्याने नेहमीप्रमाणे घरात चूल पेटवली. चूल पेटवल्यानंतर काही कारणाने आगीचा भडका उडाला आणि घराला आग लागली. घरात लाकूड तसेच पेट्रोल साठवून ठेवल्याने आग अधिक भडकली.

आग लागल्याचे लक्षात येताच सुहास गायकवाड हा गॅलरीत जाऊन उभा राहिला. तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आगीच्या ज्वाळा आणि धूर शेजारील तसेच वरच्या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत पोहोचल्याने तेथील रहिवाशांनाही फटका बसला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिडीच्या साहाय्याने गॅलरीत अडकलेल्या सुहास गायकवाड यांची तसेच त्यांनी पाळलेल्या सात पोपटांची सुखरूप सुटका केली.

मात्र, तोपर्यंत फ्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत शेजारच्या फ्लॅटलाही तडे गेले असून सुमारे ४ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या बचावकार्यामध्ये अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रदीप खेडेकर, अग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, तांडेल भरत भारती, फायरमन अनिकेत पवार, प्रतीक शिर्के, अभिषेक खाटपे, शेखर येरफुले तसेच तांडेल भरत वाडकर, फायरमन लक्ष्मण गवळी, रवी मदनावले, महेश घटमाळ, संकेत जाधव आणि केतन साठे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे करीत आहेत.