पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जैन समाज पुन्हा धावला!
युवक महासंघाकडून वाईतील जांभली आणि पांड्या गावांसाठी जीवनावश्यक साहित्य रवाना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : संकटाच्या काळात समाजासाठी धावून जाण्याची परंपरा जपणाऱ्या श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघ, पुणे यांनी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जांभली आणि पांड्या या गावांतील पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा किराणा किटचा साठा टेम्पोद्वारे रवाना करण्यात आला.
या मदत साहित्याला श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी तसेच दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शाह, सकल जैन संघाचे अचल जैन, युवक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरेश शाह, खजिनदार प्रमोदभाई, माजी अध्यक्ष विलास शाह, तसेच समीर जैन, बालचंद कटारिया, जयेश शाह, युवराज शाह, संदीप शाह, सत्यजीत शाह, मनोज शाह, शरद शाह, अल्पेश गुगरी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
युवक महासंघाचे अध्यक्ष ललित गुंदेशा यांनी सांगितले की, वाई तालुक्यातील पूरस्थितीची माहिती मिळताच महासंघाने तातडीने मदतकार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आवश्यक किराणा साहित्याची तत्काळ व्यवस्था करण्यात आली. युवक महासंघाच्या वाई युनिटमधील सदस्यांनीही सक्रिय सहभाग घेत बाधित गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदत साहित्य गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवले, जेणेकरून संकटाच्या या काळात त्यांना वेळेवर आधार मिळू शकेल.
ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या प्रत्येक प्रसंगी जैन समाज सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि आवश्यकतेनुसार पुढील मदतकार्यही सुरू ठेवण्याचा महासंघाचा निर्धार असून, समाजातील सेवाभाव आणि माणुसकीची परंपरा यापुढेही अशीच कायम राहणार आहे.
