आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पावणेसहा कोटींचे मेफेड्रॉन जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 10, 2026
Spread the love

पुणे : कात्रज येथील नवीन उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या थांबलेल्या एका तरुणाची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल पावणेसहा कोटी रुपये किमतीचे २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आले. पुण्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

प्रशांत सुरेश सावंत (वय ३८, रा. गणेशनगर, येरवडा, सध्या रा. खेसे पार्क, लोहगाव रोड) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.

‘ड्रग्ज फ्री पुणे’ अभियान यशस्वी करण्यासाठी आणि अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार ८ जुलैच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त घालत होते. पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ते कात्रज चौकातील नवीन उड्डाणपुलाखाली आले.

तेथे एक व्यक्ती प्रवासी बॅग घेऊन संशयास्पदरित्या बसलेली दिसली. इतक्या पहाटे तो तेथे थांबलेला असल्याने पोलिसांनी संशयावरून त्याची झडती घेतली.

त्याच्याकडील बॅगेत कपड्यांसह ५ कोटी ७९ लाख रुपये किमतीचे २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अतुल क्षीरसागर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, विजय कांबळे, निशिकांत सावंत, तुषार साळुंखे, अतुल क्षीरसागर, मंगेश गुंड, अमोल सरडे, विशाल भिलारे, सचिन लोहार आणि आशा भिंगारे यांनी केली.