वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप
इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे एक हजाराहून अधिक वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मार्केट यार्ड परिसरात झालेल्या कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव ईश्वर नाहर, राजकुमार नाहर, किरण छाजेड, विजय शिंगवी, मनीष संचेती, रिद्धी संचेती तसेच दिंडीप्रमुख विश्वनाथ शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि भक्तीचा जिवंत वारसा आहे. लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात. या वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा मानून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.”
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मार्केट यार्ड परिसरात मुक्काम असतो. दरवर्षी येथे सुमारे ३० हजारांहून अधिक वारकरी मुक्कामासाठी थांबतात. यावेळी राजकुमार काग, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, सचिन गादिया, सुरेश वानगोता, संकेत बोथरा, हरकचंद देसर्डा, विशाल चांदणे, महेश गायकवाड, बाबासाहेब बिबवे गोते यांच्यासह मार्केट यार्डातील अनेक व्यापारी, पदाधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूरकडे पायी निघालेला वारकरी अनेक अडचणी, संकटे आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करत असतो. त्यामुळे वारकरी हे केवळ भाविक नसून ते परमेश्वराचेच स्वरूप आहेत. त्यांच्या सेवेत योगदान देणे हे प्रत्येकाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. याच भावनेतून इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पावसाळ्यातील प्रवास अधिक सुरक्षित, सुसह्य आणि सुखकर व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. – अभय संचेती, अध्यक्ष, इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट
