‘एटीएस’ची राज्यभरात २०० जणांची झाडाझडती
पाकिस्तानी गुन्हेगारी दहशतवादी नेटवर्कशी संपर्कात असल्यांची होतेय चौकशी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियामार्फत संपर्कात असलेल्या राज्यभरातील २०० हून अधिक जणांवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पहाटेपासून कारवाई सुरू केली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचा आरोप असलेल्या शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित व्यक्तींशी सोशल मीडियावरून संपर्कात असलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे.
मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड यांसह राज्यभरात एटीएसने ही कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानस्थित या नेटवर्कचा संबंध शहजाद भट्टी, अमजद गुज्जर, आबिद जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्ना झिंगाडा, फारुख खोकर, जफर सुपारी, शानी टायगर, शेख सलमान, सरफराज डोंगर (उर्फ जोरासिंग) आणि अबू मुसा यांसारख्या गुंडांशी असल्याचे समोर आले आहे.
हे गुंड कथितरीत्या सोशल मीडियाचा वापर करून भारतातील सहज प्रभावित होऊ शकणाऱ्या तरुणांना लक्ष्य करतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर भारतात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी त्यांचा स्लीपर सेल म्हणून वापर होण्याची शक्यता तपासली जात आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून संशयास्पद संपर्कांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि राष्ट्रविरोधी तसेच दहशतवादी कारवायांसाठी तरुणांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी एटीएसने महाराष्ट्रातील २०० हून अधिक संशयित व्यक्तींच्या ठिकाणी छापे टाकले आहेत.
