आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यातील पर्यटकाची पाचगणीमध्ये निर्घृण हत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 10, 2026
Spread the love

पुणे : इंदापूरहून पाचगणीला पर्यटनासाठी आलेल्या तरुणाची दारूच्या नशेत स्थानिकांबरोबर झालेल्या वादातून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र विशाल अजित जाधव (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनूर, ता. वाई) आणि अमोल गणेदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील विशाल जाधव आणि त्यांचा मित्र अक्षय जाधव हे इतर काही मित्रांसह महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पर्यटनासाठी आले होते.

ते भोसे गावच्या हद्दीतील अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज येथे मुक्कामाला होते. बुधवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास अक्षय व त्याच्या मित्रांनी हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले.

त्यामध्ये अक्षयने जास्त मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला खोलीत झोपवले आणि ते हॉटेलच्या टेरेसवर गप्पा मारत बसले. काही वेळाने मित्र खाली आले असता, अक्षय खोलीत नव्हता.

तो कुठे गेला याचा शोध घेत असताना हॉटेलपासून काही अंतरावर लोकांची गर्दी आणि आरडाओरड ऐकू आली. तेथे जाऊन पाहिले असता, अक्षय जाधव हा निपचित अवस्थेत पडलेला दिसून आला.

काही स्थानिकांनी त्याला काठ्या, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी पाचगणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाई आणि नंतर बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

बारामती पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून विशाल जाधव यांची फिर्याद नोंदवली आणि झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करून प्रकरण पाचगणी पोलिसांकडे वर्ग केले. त्यानंतर पाचगणी पोलिसांनी तपास करून चौघांना अटक केली आहे.