मार्केट यार्डात वारकऱ्यांच्या सेवेला भक्तीची जोड
पालखी मुक्कामानिमित्त विविध व्यापाऱ्यांकडून सेवा उपक्रम : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामानिमित्त मार्केट यार्ड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांनी वारकरी भाविकांसाठी विविध सेवा उपक्रम राबवत आदरातिथ्याची परंपरा जपली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही विविध सेवा केंद्रांना भेट देत वारकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
पालखी मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांनी वारकऱ्यांसाठी अन्नदान, औषधांचे वाटप, छत्र्या, चपला तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. काही संस्थांनी वारकऱ्यांच्या प्रवासासाठी आर्थिक मदतही केली.
यावेळी राजेंद्रकुमार मोहनलाल अँड कंपनीच्या वतीने महिला वारकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. वारकरी महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटण्यात आली तसेच त्यांना साडी-चोळी देऊन ‘माहेरचा आहेर’ देण्यात आला.
महावीर बाठिया, वालचंद बाठिया, राजेंद्र बाठिया आणि उत्तम बाठिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चेनसुखलाल माणिकलाल अँड कंपनी (प्रवीण चोरबेले), नवीन पेढी (नवीन गोयल) तसेच राजेंद्रकुमार मोहनलाल अँड कंपनी आदी व्यापारी प्रतिष्ठानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी वारकरी बंधू-भगिनींना आषाढी वारीच्या शुभेच्छा देत व्यापाऱ्यांनी जपलेल्या सेवाभावी परंपरेचे कौतुक केले.
या प्रसंगी पुणे मर्चंट्स चेंबर, बाठिया परिवार, लायन्स क्लब तसेच स्थानिक विविध समाजांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शाल, उपरणे आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुग्गड, एस. के. जैन, श्याम लद्ढा, दिनेश मेहता, प्रकाश नहार, संदीप शहा, मुकेश छाजेड, किरण गुजर यांच्यासह व्यापारी, पदाधिकारी आणि बाठिया परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्यापारी प्रतिष्ठानांतील कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत होते. विठ्ठल नामाच्या गजरात आणि सेवाभावाच्या वातावरणात मार्केट यार्ड परिसर भक्ती, दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम अनुभवत होता.
