आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पठाण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 11, 2026
Spread the love

पुणे : बांधकाम व्यावसायिकाला धमकावून वेळोवेळी २५ लाख रुपयांची खंडणी उकळून दोन फ्लॅटची मागणी करणाऱ्या पठाण टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

शफी गुलजारखान पठाण (वय ६६), त्याचा मुलगा समीर शफी पठाण (वय ३५, दोघे रा. पारगेनगर, कोंढवा), कमल नितीन खैरनार (वय ६२, रा. धर्मावत पेट्रोल पंपामागे, पिसोळी) आणि साजिद हसन शेख (वय ४०, रा. पोकळे मळा, पारगेनगर) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

याबाबत अकबर मेहबूब खान (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली होती. खान हे कोंढव्यातील एका जमिनीवर बांधकाम करत होते.

जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत शफी पठाण व त्याच्या साथीदारांनी बांधकामाबाबत पुणे महापालिकेकडे वेळोवेळी खोट्या तक्रारी करून त्यांच्या बांधकामावर कारवाई केली.

या तक्रारी न करण्यासाठी व बांधकाम नियमित करून देण्याच्या नावाखाली शफी पठाण याने वेळोवेळी २५ लाख रुपयांची खंडणी घेतली. तसेच एक २ बीएचके फ्लॅटची मागणी करून बांधकाम बंद पाडण्याची भीती दाखवत आणखी १५ लाख रुपये उकळले.

आरोपींविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची संघटित गुन्हेगारी टोळी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का प्रस्ताव तयार करण्यात आला.

पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला.

मनोज पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.

शफी पठाण, समीर पठाण व त्यांच्या साथीदारांकडून खंडणीची मागणी होत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सहायक पोलीस फौजदार शेखर कोळी, पोलीस अंमलदार नितीन चव्हाण, गिरीश एकोर्गे आणि सागर माने यांनी केली.