गुलटेकडीत व्यावसायिकाची सॅक हिसकावली
साडेसहा लाखांची रोकड चोरीला : गुरुवारी रात्रीची घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुकान बंद करून घरी आलेल्या व्यावसायिकाची रोकड असलेली सॅक सोसायटीच्या आवारात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना गुलटेकडी येथे घडली. या घटनेत ६ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याप्रकरणी विकेज शहा (वय ६९, रा. हर्ष रेसिडेन्सी सोसायटी, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या आवारात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकेज शहा यांचे मार्केट यार्ड येथे बाथरूम ॲक्सेसरीजचे दुकान आहे. दुकान बंद करून ते सोसायटीच्या गेटवर आले.
त्यावेळी सोसायटीच्या रखवालदाराने त्यांच्या हातातील सॅक घेतली आणि तो त्यांच्यासोबत सोसायटीमध्ये चालत जात होता. अचानक पाठीमागून पायी आलेल्या एका चोरट्याने रखवालदाराच्या हातातील सॅक जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पळ काढला.
त्यानंतर तो बाहेर थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला. या सॅकमध्ये ६ लाख ७५ हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.
स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके पुढील तपास करीत आहेत.
