ज्येष्ठांच्या देखभालीसाठी घरगडी ठेवताय?
शुश्रृषा करण्यासाठी ठेवलेल्याने ३० लाखांचे दागिने केले लंपास : डेक्कन पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरातील दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी अनेक जण मेड किंवा घरगडी ठेवतात. ज्येष्ठांची शुश्रूषा करण्यासाठी ते दिवसभर घरीच असतात. अशावेळी घरातील उघड्यावर ठेवलेले दागिने, रोकड पाहून त्यांच्या मनात लालसा निर्माण होऊन ते चोरी करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तसेच अनेक वेळा अशा घरकाम करणाऱ्या नोकरांची पुरेशी माहिती घेतलेली नसल्याचेही आढळून येते. वृद्ध वडिलांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या घरगड्याने ३० लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर खोलीत बसविलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने घरगड्याचा चोरीचा प्रयत्न उघडकीस आला. पळून गेलेल्या या घरगड्याला डेक्कन पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले ३० लाख रुपयांचे सर्व दागिने जप्त केले आहेत.
शहाजी लक्ष्मण ढोबळे (वय ५९, रा. जनवाडी) असे अटक करण्यात आलेल्या घरगड्याचे नाव आहे. याबाबत संदीप दीपक नुलकर (वय ५६, रा. नंदादीप अपार्टमेंट, आपटे रोड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नुलकर यांचे वडील ८४ वर्षांचे असून त्यांना स्वतःची दैनंदिन कामे करता येत नसल्याने ओळखीच्या एका परिचारिकेमार्फत शहाजी ढोबळे याला २१ एप्रिल २०२६ पासून कामावर ठेवण्यात आले होते.
२१ जूनपासून त्यांच्या आईला कपाटातील काही दागिने मिळून येत नव्हते. त्यांनी ही बाब संदीप नुलकर यांना सांगितली. याची पडताळणी करण्यासाठी २२ जून रोजी त्यांनी आईच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचा अॅक्सेस आपल्या मोबाईलवर घेतला.
वडिलांच्या देखभालीसाठी असलेला शहाजी ढोबळे हा संध्याकाळी आईच्या कपाटाजवळ येऊन पाहणी करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर २३ जून रोजी त्याने जवळपास दोन तास आईच्या खोलीतील कपाटाची पाहणी करून ते उघडण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही दिवशी त्याच्या हालचालींवरून त्याने कपाट उघडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आईचे ३० लाख रुपयांचे दागिने त्यानेच चोरल्याचा संशय बळावला.
याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तो कामावरही आला नाही. त्यामुळे २४ जून रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.
डेक्कन पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो घरी मिळून आला नाही. तसेच तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
अखेर १० जुलै रोजी तो गोखलेनगर परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० लाख रुपयांचे सुमारे २० तोळे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्धकी, महेश काळे, संजय दंडगुळे, स्वप्निल गायकवाड आणि धनश्री सुपेकर यांनी केली.
ही काळजी घ्या :
- दिवसभर देखभालीसाठी महिला किंवा पुरुष ठेवताना तो अधिकृत एजन्सीकडील असल्याची खात्री करा.
- संबंधित नोकराची संपूर्ण माहिती, फोटो आणि आधार कार्ड क्रमांक नोंदवून ठेवा.
- घरातील मौल्यवान वस्तू, दागिने किंवा रोकड नोकराच्या सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी उघड्यावर ठेवू नका.
- दागिने व रोकड नेहमी कुलूपबंद कपाटातच ठेवा आणि कुलूप व्यवस्थित लावल्याची खात्री करा.
- अंथरुणाला खिळलेल्या किंवा स्वतःची कामे स्वतः करू न शकणाऱ्या ज्येष्ठ आई-वडिलांच्या अंगावर जास्त सोन्याचे दागिने ठेवू नका.
- नोकर विश्वासू असला तरी घरातील मौल्यवान वस्तू नियमितपणे तपासून त्या योग्य ठिकाणी आहेत याची खात्री करा.
- नोकराकडे एटीएम कार्ड किंवा त्याचा पासवर्ड कधीही देऊ नका.
