रागाच्या भरात पतीने घराला लावली आग
अनैतिक संबंधाबाबत पत्नीने विचारला जाब : घरगुती साहित्याबरोबर ३ मांजरींचा मृत्यू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधाबाबत पत्नीने जाब विचारल्याच्या रागातून पतीने स्वतःच्या घराला आग लावली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले, तसेच पाळलेल्या तीन मांजरींचा होरपळून मृत्यू झाला. पर्वती पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दयानंद अनंता कसबे (वय ३८, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना ९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावित्रीबाई फुले वसाहतीतील त्यांच्या घरी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद कसबे यांचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.
त्यांच्या मुलाने दयानंद कसबे यांना एका महिलेसोबत पाहिले होते. त्याने ही बाब घरी येऊन आईला सांगितली. त्यानंतर पत्नीने दयानंद कसबे यांना याबाबत जाब विचारला.
यानंतर फिर्यादी त्या महिलेच्या कोथरूड येथील घरी गेल्या व तिला आपल्या पतीचा नाद सोडण्यास सांगितले. संबंधित महिलेने ही बाब दयानंद कसबे यांना फोन करून कळविली. त्यामुळे संतप्त झालेल्या दयानंद कसबे यांनी रागाच्या भरात स्वतःच्या राहत्या घराला आग लावली.
या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा घरामध्ये पाळलेल्या तीन मांजरी होत्या. त्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
