आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मानवतेचा जिवंत संदेश! मुथ्था परिवाराची नारायणगावकरांना विनामूल्य ‘शीत शवपेटी’ची भेट

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 13, 2026
Spread the love

नारायणगाव : सामाजिक बांधिलकी जपत दुःखाच्या प्रसंगी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आदर्श नारायणगावातील मुथ्था परिवाराने पुन्हा एकदा घालून दिला आहे. स्व. दादी रखमाबाई नंदरामशेठ मुथ्था यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारायणगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल मुथ्था, सुयोग मुथ्था आणि समस्त मुथ्था परिवाराच्या वतीने महावीर भवन, नारायणगाव येथे नागरिकांसाठी विनामूल्य ‘शीत शवपेटी’ (Freezer Box) उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे होते. यावेळी कृषिरत्न अनिल मेहेर, अमित बेनके, नारायणगावचे उपसरपंच बाबूभाऊ पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, अशोक गांधी आणि सुरज वाजगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात हर्षल मुथ्था यांनी या समाजोपयोगी उपक्रमामागील भावना आणि त्यामागील उद्देश उपस्थितांसमोर स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद दरेकर यांनी केले.

या उपक्रमामागील उद्देश अत्यंत संवेदनशील आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांना किंवा आप्तस्वकीयांना अंतिम दर्शनासाठी पोहोचण्यास विलंब होतो.

अशा वेळी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन, मृतदेहाची हेळसांड होऊ नये तसेच सर्व नातेवाईकांना आपल्या प्रिय व्यक्तीचे अंतिम दर्शन शांतपणे आणि सन्मानाने घेता यावे, या उदात्त हेतूने मुथ्था परिवाराने ही शीत शवपेटी समाजासाठी उपलब्ध करून दिली आहे.

मुथ्था परिवारातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली ही शीत शवपेटी नारायणगाव तसेच संपूर्ण शिवजन्मभूमी परिसरातील नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असणार आहे.

समाजोपयोगी आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत असून, दुःखाच्या क्षणी गरजू कुटुंबांना मोठा आधार ठरणार आहे.