आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी शहर डीबी पथकाची धडक कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 13, 2026
Spread the love

बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डीबी पथक) उल्लेखनीय कामगिरी करत शनिवार आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अवघ्या एका तासात जेरबंद केले. आरोपींकडून चोरीस गेलेले चारही मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, एकूण ₹४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता संभाजीनगर, रेल्वे स्टेशन रोड, बार्शी येथील लक्ष्मण शामराव लांडगे (वय ४०) हे कुटुंबासह शनिवार आठवडा बाजारात भाजी खरेदीसाठी आले होते.

गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ₹२० हजार किमतीचा Motorola कंपनीचा मोबाईल लंपास केला. त्याच वेळी बाजारात आलेल्या आणखी तीन नागरिकांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले.

याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एका तासात बीड जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन गोरख इटकर (वय ४०, रा. वडारवाडा, बार्शी नाका, जि. बीड) आणि अण्णा शिवाजी इटकर (वय ४१, रा. सैनिक विद्यालयाजवळ, राजुरी, ता. व जि. बीड) यांचा समावेश आहे. आरोपींची अंगझडती घेतली असता चोरीचे चारही मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोलीस हवालदार प्रवीण साठे, सुनील बनसोडे, कोतवाल तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद अकुलवार, दत्ता सोमवाड, वैभव भांगे, सचिन राऊत, सचिन देशमुख, सतीश उघडे, राहुल उदार, अंकुश जाधव, अविनाश पवार, अजित शेख आणि सचिन नितनाथ यांनी सहभाग घेतला.

अवघ्या तासाभरात गुन्ह्याची उकल करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल बार्शी शहर पोलिसांच्या या कारवाईचे व्यापारी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आठवडा बाजार किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी मोबाईल, पाकीट व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तात्काळ बार्शी शहर पोलिसांशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी.