आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकरी ठार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 13, 2026
Spread the love

पुणे : सासवडहून जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुढे असलेल्या दिंडीतील महिलांना वारीतील ट्रकने धडक दिली. या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, ४ महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. वाहनांसाठी राखीव असलेल्या उजव्या बाजूच्या रस्त्यावरून वारकरी जात असल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), माधवी राजाराम सालगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

हा अपघात सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळील हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताचे ठिकाण पालखी सोहळ्यापासून सुमारे १२ किलोमीटर पुढे होते.

अपघातग्रस्त ट्रक हा पालखीसोबत असलेल्या वाहनांपैकी एक होता. अपघाताच्या वेळी पालखी बोरावके मळा येथे होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारकरी आणि वाहनांची सुरक्षित व नियोजित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने रस्ता दुभाजकाद्वारे विभागण्यात आला होता.

दुभाजकाच्या उजव्या बाजूचा रस्ता केवळ वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला होता, तर डाव्या बाजूचा रस्ता पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आला होता.

तरीही काही वारकरी अधूनमधून वाहनांसाठी राखीव असलेल्या रस्त्यावर येत होते किंवा त्या मार्गाने चालत होते. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक पालखीसोबत असलेल्या वाहनांपैकी एक होता.

हा ट्रक दुभाजकाच्या उजव्या बाजूने, म्हणजेच वाहनांसाठी राखीव मार्गाने जेजुरीकडे जात होता. त्याचवेळी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील ७ महिला वारकरी त्या मार्गावरून जात होत्या.

ट्रकचालक ७० वर्षांचा असून, तो अस्वस्थ होता. त्याने ताप आणि सर्दीसाठी औषधे घेतली होती. जेजुरीकडे जात असताना दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ट्रक डाव्या बाजूला वळविला.

त्यामुळे ट्रकने ७ महिला वारकऱ्यांना धडक दिली. या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४ महिला जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य, जखमींना वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण, घटनास्थळाचे जतन, पंचनामा तसेच आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.