वारकऱ्यांच्या सेवेत ‘सूर्यदत्त’ची आरोग्य भारती–चरण सेवा
कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व फार्मसीतर्फे पालखी सोहळ्यात उपचार : आरोग्य मार्गदर्शन आणि समाजसेवेचा अनोखा संगम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आषाढी वारीनिमित्त वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘सूर्यदत्त’च्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘आरोग्य भारती–चरण सेवा’ या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नाना पेठ येथे झालेल्या या उपक्रमात २५० हून अधिक वारकऱ्यांना फिजिओथेरपी उपचार, आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन देण्यात आले.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेची अनोखी मानवंदना म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘संस्कार, संस्कृती आणि शिक्षण’ या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर आणि प्राचार्या डॉ. सारिका झांबड यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
आषाढी वारीमध्ये शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना स्नायू आणि सांध्यांवरील ताण, पायांतील वेदना, थकवा तसेच अन्य शारीरिक त्रास जाणवतात.
हे लक्षात घेऊन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची सखोल तपासणी करून आवश्यक उपचार दिले. प्रा. डॉ. चैताली नेवे (पीटी), डॉ. आयझॅक साळवे (पीटी) आणि डॉ. अक्षता माने (पीटी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरात वेदनाशामक उपचार, सॉफ्ट टिश्यू व मायोफॅशियल रिलीज, जॉइंट मोबिलायझेशन, स्ट्रेचिंग व स्ट्रेंथनिंग व्यायाम, शरीरस्थिती सुधारणा, चालण्याचे प्रशिक्षण, संतुलन व कार्यक्षमता वाढविणारे व्यायाम आणि आवश्यकतेनुसार किनेसिओ टेपिंग करण्यात आले.
तसेच घरच्या घरी करता येणारे व्यायाम, योग्य पद्धतीने चालण्याबाबत मार्गदर्शन, दुखापत प्रतिबंधक उपाय आणि किरकोळ स्नायू व सांध्यांच्या दुखापतींवर प्रथमोपचार देण्यात आले.
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चमधील पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी वारकऱ्यांना पायांची मालिश, प्राथमिक आरोग्य तपासणी, औषधोपचार, आरोग्य समुपदेशन आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन दिले.
दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी समन्वयाने दिलेल्या सेवेमुळे वारकऱ्यांना शारीरिक थकवा व वेदनांपासून दिलासा मिळाला.
दीर्घकाळ पायी चालताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, पायांची योग्य निगा कशी राखावी आणि संभाव्य दुखापतींपासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याविषयीही वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
वारकरी भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. रास्ता पेठ येथील मराठा मित्र मंडळाचे सदस्य उमेश शेडगे यांनी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या समाजाभिमुख कार्याचे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
भविष्यातही विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
वारकरी भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, निरोगी आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या व्यवस्थापनाने कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कॉलेज ऑफ फार्मसी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, प्राध्यापक, विद्यार्थी आणि आयोजकांचे अभिनंदन केले. समाजहिताचे असे सेवाभावी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.
आषाढी वारी ही केवळ श्रद्धेची परंपरा नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव आहे. वारकरी भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची बाब आहे. ‘संस्कार, संस्कृती आणि शिक्षण’ या सूर्यदत्तच्या मूल्यांसोबत प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये समाजसेवेची भावना रुजावी, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ‘आरोग्य भारती–चरण सेवा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करून ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
