बार्शी तालुका पोलिसांच्या ‘अमावस्या ऑल आऊट’ अभियानात ४ वाहनचालकांवर कारवाई
मद्यधुंद लक्झरी बसचालकावर कारवाई : ३२ प्रवाशांचा संभाव्य अनर्थ टळला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या नियंत्रणाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘अमावस्या ऑल आऊट’ विशेष अभियानांतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान दारूच्या नशेत ३२ प्रवाशांना घेऊन जाणारी लक्झरी बस पोलिसांनी वेळीच अडविल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच रस्ते अपघातांना प्रतिबंध करणे, या उद्देशाने रात्री विशेष वाहन तपासणी व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
विविध ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली असता एकूण चार वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळून आले.
यामध्ये पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथील सौरभ कचरू तौर हा एमएच १४ एलएक्स ४५८१ क्रमांकाची किया चारचाकी, साकत (ता. बार्शी) येथील दिनेश रामकृष्ण मोरे हा एमएच १३ डीव्ही ०५३५ क्रमांकाची दुचाकी, शिवाजीनगर, अलिपूर रोड (बार्शी) येथील ऋषीकेश रमेश जाधव हा एमएच १३ बीई ९१३७ क्रमांकाची दुचाकी, तर नायगाव (ता. चाकूर, जि. लातूर) येथील हरी त्रिबंक सिरसाठे हा एमएच २४ एबी ७४५२ क्रमांकाची लक्झरी बस दारूच्या नशेत चालविताना आढळून आला.
चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १८५ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दारू पिऊन वाहन चालविणे हा गंभीर व जीवघेणा गुन्हा असून अशा वाहनचालकांविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार आहे.
नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहन चालवावे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वात पार पडली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, वाहतूक पोलीस नाईक प्रदीप जगताप, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमेश माने, पोलीस कॉन्स्टेबल उत्तम चौधरी तसेच ठाणे अंमलदार पोलीस नाईक राजेंद्र कावळे व ठाणे अंमलदार सहकारी मोहम्मदगौस मेहंदी यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
ठळक बाब – लातूरहून पुण्याकडे ३२ प्रवाशांना घेऊन जाणारी लक्झरी बस मद्यधुंद अवस्थेत चालविताना पोलिसांच्या नाकाबंदीत आढळून आली. चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून सर्व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण केला होता. पोलिसांनी तत्काळ बस थांबवून चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाले. वेळेत कारवाई झाल्याने संभाव्य भीषण अपघात टळून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न मार्गी लागला.
