आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आता मीठही राहिले नाही शुद्ध

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 15, 2026
Spread the love

पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध, तेल तसेच मिठाईतील भेसळीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. जेवणात मीठ नसेल, तर ते अळणी होते. अत्यावश्यक आणि अतिशय कमी किमतीत मिळणारे मीठही आता शुद्ध मिळेल, याची खात्री देता येत नाही. ‘टाटा सॉल्ट’ या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मीठ विकले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत कृष्णा देवीप्रसाद कनोजिया (वय ५०, रा. कुरार व्हिलेज, मुंबई) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी धवल जैन (वय ६०, रा. गुलटेकडी, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फुरसुंगी–हडपसर रस्त्यावरील खुटवड चौक येथील आरंभ डिस्ट्रीब्युटर्स येथे १४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर–सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागातील आरंभ डिस्ट्रीब्युटर्सच्या गोदामात ‘टाटा सॉल्ट’ या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मिठाच्या पुड्यांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती कॉपीराइट कंपनीचे अधिकारी कृष्णा कनोजिया यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती फुरसुंगी पोलिसांना दिली.

पोलिसांनी या गोदामावर छापा टाकला. तेथे ‘टाटा सॉल्ट’च्या नावाने विक्रीसाठी ठेवलेले चार हजार रुपये किमतीचे मिठाचे १३२ पुडे आढळून आले. पोलिसांनी कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.