सून आणायला गेलो, मुलगा गमावला
केतनच्या आठवणींनी वडिलांना अश्रू अनावर : मित्तल दाम्पत्याच्या चौकशीची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : माझे वडील गेले, माझा मुलगा गेला. महिनाभरातील या दोन घटनांमुळे आमच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. माझा २६ वर्षांचा मुलगा आज आमच्यात नाही. तो माझ्या अर्थीला खांदा देईल, असे मला वाटत होते. मात्र, दुर्दैवाने मला त्याच्याच अर्थीला खांदा द्यावा लागला, असे सांगताना केतन अगरवालचे वडील विशाल अगरवाल यांना अश्रू अनावर झाले.
केतन अगरवाल हत्या प्रकरणाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विशाल अगरवाल यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. मी माझ्या घरासाठी सून आणायला गेलो होतो. मात्र, आता माझा मुलगाच राहिलेला नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.
मित्तल यांनी आम्हाला, ‘तुमचीच मुलगी आहे, असे समजून घ्या,’ असे सांगितले होते. मात्र, आता त्यांचा फोन येत नाही आणि आमचे बोलणेही होत नाही.
मित्तल हे आमचे जवळचे नातेवाईक आहेत. मी त्यांना मामा म्हणून ओळखतो. ते माझ्या आईचे भाऊ लागतात. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत असे का केले, असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे विशाल अगरवाल म्हणाले.
केतन आणि सिया यांच्यातील संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले, सिया नाराज व्हायची. ‘फोन बिझी असतो,’ असे केतन आम्हाला सांगायचा. आम्ही त्याला समजावून सांगायचो की, तुमचे नाते नवीन आहे. काही दिवसांनी सर्व काही ठीक होईल.
या प्रकरणातील जे काही सत्य असेल, ते सर्व समोर येईल. माझ्यासोबत आणि संबंधित व्यक्तींसोबत जे काही घडले, त्याबाबत मला जे वाटत होते, ते सर्व मी पोलिसांना सांगितले आहे.
पोलीस योग्य तपास करतील आणि माझ्या मुलाला न्याय देतील, असा विश्वास आहे, असे विशाल अगरवाल यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मित्तल आणि रेणू मित्तल यांची चौकशी झाली पाहिजे.
या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील, त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विशाल अगरवाल यांनी केली. मित्तल यांच्याबद्दल मी अधिक बोलणार नाही. मला जे काही सांगायचे होते, ते पोलिसांना सांगितले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
केतनला निष्पक्ष न्याय मिळावा, यासाठी आपण पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे विशाल अगरवाल यांनी सांगितले. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
दुसरा केतन होऊ नये – माझे वडील केतनच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याने गेले. आमच्या कुटुंबावर एकामागून एक मोठे आघात झाले आहेत. सियाने एकदा स्पष्टपणे नकार दिला असता, तर पुढे काहीच घडले नसते. समाजाला माझी विनंती आहे की, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. दुसरा केतन होऊ नये, असे आवाहन करताना विशाल अगरवाल भावुक झाले.
