येरवडा कारागृहात ‘अभंग वाणी’चा भक्तिमय सोहळा
५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विठ्ठल नामाच्या गजराने कारागृह परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक आरोग्याला चालना देत त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार आणि नवजीवनाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी (१७ जुलै) ‘अभंग वाणी’ या भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५०० बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विठ्ठल नामाच्या गजरात सहभागी होत भक्तिरसाचा अनुभव घेतला.
कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार बंद्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आर. के. स्मृती बहुउद्देशीय संस्था, पुणे, ऋषीआनंद वन, हडपसर आणि सुकांता थाळी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात गायक ओंकार लोहार आणि गायत्री कुंडेकर यांनी अभंग, भजने तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात सादर केलेल्या भक्तिमय रचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण कारागृह परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. बंद्यांनीही एकमुखाने विठ्ठलाचा गजर करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी संस्थेचे संस्थापक आनंद साळुंखे, सचिव भाग्यश्री साळुंखे, विजयकुमार मर्लेचा, प्रमोद छाजेड तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्य विधिमंडळ ग्रंथ विभागाचे मुख्य अधिकारी बाबासाहेब वाघमारे उपस्थित होते. आयुष्यातील चुकांमुळे कारागृहात येण्याची वेळ आली असली, तरी अध्यात्म, संस्कार आणि भक्तीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळते, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा मिळते, असे सांगितले.
हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. सुहास वारके यांच्या संकल्पनेतून तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अतिरिक्त अधीक्षक श्रीमती पल्लवी पी. कदम, उपअधीक्षक आर. ई. गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस. आर. पाटील, शिक्षक एन. आर. शिंदे, शिक्षक जी. व्ही. तागड तसेच इतर कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मानवी मनाला स्पर्श करणारा उपक्रम
तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आत्मपरीक्षणाचा एक टप्पा येत असतो. अशा वेळी उपदेशापेक्षा संस्कार, संगीत आणि अध्यात्म अधिक प्रभावी ठरतात. येरवडा कारागृहातील ‘अभंग वाणी’ हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हता, तर बंदिवानांच्या मनात आशा, आत्मविश्वास आणि नव्या जीवनाची प्रेरणा जागविण्याचा एक अर्थपूर्ण प्रयत्न होता. कारागृहाच्या उंच भिंतींच्या आत घुमलेला विठ्ठल नामाचा गजर अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तनाची नवी दिशा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
