आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल व्यावसायिकावर हल्ला करणार्‍या ६ जण जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 18, 2026
Spread the love

पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरुद्ध फिर्याद देणाऱ्या मोबाईल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा जणांना खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांच्यावर १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी आठ ते दहा जणांनी हल्ला केला होता. त्यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी नीलेश घायवळ टोळीतील प्रशांत धुमाळ, ऋषिकेश शिरगावकर, प्रशांत नवघणे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिद्धेश नितीन धुमाळ (वय २५, रा. घोरपडे पेठ), नागेश ऊर्फ लाडू राजू मानिके (वय १९, रा. धानोरी रोड, भीमनगर, विश्रांतवाडी), राज तुषार धुमाळ (वय १९, रा. पटवर्धन बाग, एरंडवणे), प्रसाद सुभाष मारणे (वय ३१, रा. संगम चौक, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड), आदित्य अश्विनीकुमार डाके (वय २८, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) आणि मेघराज ज्ञानेश्वर बारंगळे (वय ३५, रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नीलेश घायवळ याच्या टोळीतील प्रशांत धुमाळ याला यापूर्वी अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धेश धुमाळ आणि नागेश मानिके यांच्याविरुद्ध यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. यातील दोघे जण नीलेश घायवळ राहत असलेल्या कॉलनीमध्येच राहतात; मात्र ते त्याच्या टोळीशी संबंधित नव्हते.

मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यातील आरोपींचा खंडणीविरोधी पथक शोध घेत होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड तसेच अंमलदार सोमनाथ कांबळे आणि रहीम शेख यांना सिद्धेश धुमाळ हा घोरपडे उद्यान परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या सिद्धेश धुमाळ याला पकडले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून नागेश मानिके, राज धुमाळ आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अन्य तिघांना पकडण्यात आले. अमित शिंदे यांच्याशी झालेल्या अंतर्गत वादातून त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक महेश सागडे, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, नानासाहेब कदम तसेच पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, रहीम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, नितीन कांबळे, मयूर भोकरे, किरण मोरे, नितीन बोराटे, सुहास जगताप, मुकुंद तारू, अतुल साठे, हानिफ शेख, अमित बोरडे, किशोर शिंदे आणि पुरुषोत्तम गुनला यांनी ही कामगिरी केली.