बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, ५० CCTV तपासून आरोपी पुण्यातून जेरबंद
६ टोलनाके, २३० किमीचा पाठलाग अन् तीन दिवसांच्या तपासातून अज्ञात वाहनासह चालकाचा शोध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी-कुर्डूवाडी मार्गावरील शेंद्री फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत बार्शी तालुका पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तब्बल ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज, ६ टोलनाक्यांची माहिती आणि २३० किलोमीटर अंतरावरील पुणे येथे जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईबद्दल बार्शी तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ व १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात राजाभाऊ प्रभाकर शिंदे (वय ४८, रा. कामखेडा, ता. रेणापूर, जि. लातूर) यांचा बार्शी-कुर्डूवाडी रोडवरील शेंद्री फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.
अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाल्याने आरोपी व वाहन अज्ञात होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना विशेष सूचना दिल्या.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अपघात पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली. सलग तीन दिवस अपघातस्थळाच्या चारही दिशांतील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले.
तसेच ६ टोलनाक्यांवरील नोंदींची पडताळणी करण्यात आली. या तपासातून अपघातातील वाहन एमएच-१२-एक्सएच-३१९८ (वॅगनार) असल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित वाहनाचा माग काढत पोलिसांनी आरोपी धर्मा बाबा जाधव हा पुण्यातील कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळवली.
पुढील चौकशीत अपघातानंतर आरोपीने वाहन कात्रज येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवले असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित गॅरेजवर सापळा रचून अत्यंत शिताफीने आरोपी धर्मा बाबा जाधव याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने सदर अपघात केल्याची कबुली दिली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत आरोपीस अटक करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश आल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे, हनुमंत काळे, अतुल बाकले, युवराज गायकवाड, शिवशंकर खराडे आणि सागर वाकळे यांनी पार पाडली.
