वादातून १७ वर्षीय तरुणावर वार करून निर्घृण खून
कात्रज कट्टा येथील रात्रीची घटना : भारती विद्यापीठ पोलिसांकडून ७ जणांवर केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बहिणीशी वाद झाल्याच्या कारणावरून तिच्या भावाने साथीदारांच्या मदतीने एका १७ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर, हातावर तसेच शरीरावर ठिकठिकाणी सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते. ही घटना कात्रज तलावाजवळील कात्रज कट्टा येथे सोमवारी रात्री दहा वाजता घडली. याबाबत गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चव्हाण आणि गणेश माळवे हे दोघे लहानपणापासून मित्र आहेत. तीन महिन्यांपूर्वी गणेश माळवे याचा आकाशच्या बहिणीशी वाद झाला होता.
त्यामुळे आकाश गणेश माळवेवर चिडून होता. त्याने गणेश माळवेला ठार मारण्याची धमकीही दिली होती. गणेश माळवे याने कात्रज कट्ट्याशेजारील एका दुकानात मोबाईल दुरुस्तीसाठी दिला होता. त्यानंतर तो गणेश चव्हाण यांच्या घरी आला होता.
मोबाईल घेण्यासाठी गणेश चव्हाण हे गणेश माळवेला सोबत घेऊन रात्री दहा वाजता कात्रज कट्टा येथील दुकानात गेले. दुकानदाराने मोबाईल दुरुस्त करून दिल्यानंतर ते तो पाहत असताना दोन-तीन दुचाकींवरून आकाश आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे लोखंडी हत्यारे होती.
त्यांना पाहून फिर्यादी दुकानात गेले, तर गणेश माळवे पळून जाऊ लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने अनेक वार केले. त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतरही हल्लेखोर त्याच्यावर वार करत होते. गणेश निपचित पडल्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले.
फिर्यादीने या घटनेची माहिती आदित्य माळवे यांना दिली. त्यांनी गणेश माळवेला भारती हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
भारती विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.
