आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 22, 2026
Spread the love

पुणे : गेले तीन ते चार दिवस सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी जोर धरला असून, घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत आज (बुधवारी) बैठक होणार असून, धरण परिसरात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत भिरा येथे सर्वाधिक ३०९ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल ताम्हिणी येथे २७५ मिमी, दावडी येथे २६४ मिमी, शिरगाव येथे २५५ मिमी, मुळशी येथे १५४ मिमी, डोंगरवाडी येथे १९७ मिमी, लोणावळा येथे १४२ मिमी, वळवण येथे १२३ मिमी, कोयना (नवजा) येथे ८५ मिमी, अपर वैतरणा येथे २२४ मिमी आणि अंबोणे येथे १८५ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, वडज धरण ८२ टक्के भरले असून, तेथून नदीपात्रात ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोड धरण ९९ टक्के भरल्याने तेथून ३ हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

चिल्हेवाडी धरण ७८ टक्के भरले असून, तेथून १,१२६ क्युसेक पाणी सोडले जात आहे. कळमोडी धरण १०० टक्के भरल्याने १,६९६ क्युसेक, वडिवळे धरणातून २,५५२ क्युसेक आणि कासारसाई धरणातून ७५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

तसेच, उजनी धरणातून पंढरपूर यात्रेसाठी भीमा नदीत ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.