पावसाची अनेक ठिकाणी शतकी बॅटिंग
खडकवासला धरणसाखळीत ७२ टक्के पाणीसाठा, कोयना ६२ टक्के
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यभर पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने शतकी बॅटिंग केल्याचे दिसून आले आहे. खडकवासला धरणसाखळीत ७२ टक्के पाणीसाठा झाला असून, कोयना धरणात ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईकरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. तसेच मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
गेल्या २४ तासांत घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. ताम्हिणी येथे २८० मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत तेथे एकूण ४५१९ मिमी पाऊस झाला आहे. भिरा येथे २४९ मिमी, दावडी १९६ मिमी, लोणावळा १३३ मिमी, वळवण १०३ मिमी, डोंगरवाडी १७० मिमी, मुळशी १२४ मिमी, आंबोणे १५० मिमी, कोयना (नवजा) १०८ मिमी, वैतरणा १८५ मिमी, तानसा १०३ मिमी, अपर वैतरणा २३० मिमी, मध्य वैतरणा २०७ मिमी आणि तुळशी येथे १६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी झालेला पाऊस :
कुरवंडे – ११० मिमी, भोर – ६३ मिमी, तळेगाव – २६ मिमी, चिंचवड – १५ मिमी, पाषाण – ९ मिमी, शिवाजीनगर – ८ मिमी, बारामती – ७ मिमी, एनडीए – ७ मिमी.
या धरणांतून विसर्ग सुरू
वडज धरण ८१ टक्के भरले असून, धरणातून २२०० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. घोड धरण ९७ टक्के भरले असून, त्यातून ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. चिल्हेवाडी धरण १०० टक्के भरले असून, त्यातून १६९८ क्युसेक पाणी सोडले जात आहे. कळमोडी धरण १०० टक्के भरले असून, त्यातून १२३८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चासकमान धरण ९७ टक्के भरले असून, त्यातून १० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. वडिवळे धरण ९८ टक्के भरले असून, त्यातून ४७०३ क्युसेक पाणी सोडले जात आहे. कासारसाई धरण ९५ टक्के भरले असून, त्यातून ७५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरण ९७ टक्के भरले असून, त्यातून ४६३७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला धरण ९९ टक्के, वरसगाव ७१ टक्के, पानशेत ७६ टक्के आणि टेमघर ५४ टक्के भरले आहे. खडकवासला धरणसाखळीत एकूण २१ टीएमसी म्हणजेच ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २३ टीएमसी म्हणजेच ७९ टक्के पाणीसाठा होता.
पुणे जिल्ह्यातील धरणांची स्थिती
पिंपळगाव जोगे – १७ टक्के, माणिकडोह – ४१ टक्के, येडगाव – ६४ टक्के, डिंभे – ६८ टक्के, विसापूर – ९३ टक्के, भामा आसखेड – ८४ टक्के, आंद्रा – ८९ टक्के, पवना – ९२ टक्के, मुळशी – ८३ टक्के, गुंजवणी – ७५ टक्के, भाटघर – ६५ टक्के, नाझरे – ४५ टक्के, उजनी – ५४ टक्के, सीना-कोळेगाव – उणे ८ टक्के.
कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती
कोयना – ६२ टक्के, धोम – ६५ टक्के, कण्हेर – ९१ टक्के, वारणा – ६८ टक्के, दुधगंगा – ४४ टक्के, राधानगरी – ८५ टक्के, तुळशी – ६६ टक्के, कासारी – ७० टक्के, पाटगाव – ५८ टक्के, धोम-बलकवडी – ८५ टक्के, ऊरमोडी – ७० टक्के आणि तारळी – ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
