आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुबईत पसार झालेल्या अविनाश राठोडचे भारतात प्रत्यार्पण

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 25, 2026
Spread the love

पुणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून दुबईला पळून गेलेल्या आरोपीला तीन वर्षांनंतर भारतात परत आणण्यात सरकारला यश आले आहे.

अविनाश अर्जुन राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत; मूळ रा. जावळा, पो. साखरा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

यूएई सरकारने त्याचे भारतात प्रत्यार्पण केले. त्यानंतर त्याला एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात आले. पुणे पोलिसांनी त्याला विमानतळावर ताब्यात घेऊन अटक केली.

अविनाश राठोडने एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी (APS Wealth Ventures LLP) ही कंपनी स्थापन करून गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते.

त्यामध्ये फिर्यादीने ८६ लाख ३७ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली होती. फिर्यादीसह अन्य गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड हे कंपनी बंद करून फरार झाले होते.

याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांच्याविरुद्ध २४ एप्रिल २०२४ रोजी एलओसी जारी करण्यात आली होती. शिवाजीनगर न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते.

या गुन्ह्यात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, अविनाश राठोडचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध ४ जून २०२६ रोजी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

त्यानंतर भारत सरकारने संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारसोबत आरोपीबाबत चर्चा करून त्याचे प्रत्यार्पण करून घेतले. अविनाश राठोडला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.