खडकवासला धरणात ८९ टक्के पाणीसाठा
उजनी धरण ९१ टक्के भरले : जिल्ह्यातील १६ धरणातून विसर्ग सुरु
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एल निनोमुळे देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनने जोरदार वर्षाव सुरू केला असून तो अद्यापही सुरू आहे. त्यामुळे पश्चिम घाट परिसरातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील २७ धरणांपैकी १६ धरणे भरत आल्याने त्यांतून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे उजनी धरणात तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीइतकाच ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अद्याप कायम आहे. खडकवासला १०० टक्के, पानशेत ९४ टक्के, वरसगाव ८७ टक्के, तर टेमघर ७४ टक्के भरले आहे.
खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी २५.९८ टीएमसी म्हणजेच ८९.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २६.१५ टीएमसी म्हणजेच ८९.६८ टक्के पाणीसाठा होता.
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा : भामा आसखेड – ९६ टक्के, वडिवळे – ९७ टक्के, आंद्रा – १०० टक्के, कासारसाई – ९७ टक्के, मुळशी – ९७ टक्के, पिंपळगाव जोगे – ३९ टक्के, माणिकडोह – ४९ टक्के, येडगाव – ९८ टक्के, वडज – ८४ टक्के, डिंभे – ९२ टक्के, घोड – ९७ टक्के, विसापूर – ९१ टक्के, चिल्हेवाडी – ७९ टक्के, कळमोडी – १०० टक्के, चासकमान – ९५ टक्के, गुंजवणी – ८४ टक्के, निरा देवधर – ८७ टक्के, भाटघर – ८२ टक्के, वीर – ९८ टक्के, नाझरे – ७४ टक्के, उजनी – ९१ टक्के, सीना-कोळेगाव – उणे ८ टक्के.
प्रमुख ठिकाणचा पाऊस : लोणावळा – ७० मिमी, ताम्हिणी – २१० मिमी, आंबोणे – ९१ मिमी, दावडी – १३४ मिमी, मुळशी – ८० मिमी, भिरा – १२७ मिमी, वळवण – ४० मिमी, गिरीवन – ५० मिमी, कुरवंडे – ३७ मिमी, भोर – २३ मिमी, तळेगाव – २१ मिमी, राजगुरुनगर – ६ मिमी, चिंचवड – ५ मिमी, तर पाषाण आणि शिवाजीनगर येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस खूप कमी झाला आहे. त्याचवेळी उजनी धरणातील पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पश्चिमेकडील धरणांतून होणारा विसर्ग आणि पाऊस लक्षात घेता उजनी धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या इंदापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील अनेक तालुक्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कृष्णा खोरातील धरण स्थिती : कोयना – ७२ टक्के, धोम – ७७ टक्के, कण्हेर – ९१ टक्के, वारणा – ७८ टक्के, दुधगंगा – ५१ टक्के, राधानगरी – ८८ टक्के, तुळशी – ७२ टक्के, कासारी – ७६ टक्के, पाटगाव – ६२ टक्के, धोम-बलकवडी – ८५ टक्के, ऊरमोडी – ८४ टक्के, तारळी – ७८ टक्के.
