भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या वाहनांच्या बोनटवर बसवून परिसरात फिरविल्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाच्या चौकशीचा फेरा आलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलाचा खून झाला होता. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.
त्यानंतर या मुलांना पोलिसांच्या वाहनांच्या बोनटवर बसवून परिसरात फिरवण्यात आले होते. यावेळी खून झालेल्या मुलाच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारहाण केली. तसेच या अल्पवयीन मुलांना गुडघ्यावर बसवूनही मारहाण करण्यात आली होती.
या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोगाने एका समितीची स्थापना केली आहे.
या समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली. संबंधितांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले.
