उसने पैशांवरून मित्राच्या छातीत चाकू भोसकून खून
डिलिव्हरी बॉयचे कृत्य : चंदननगरमधील घटनेतील आरोपीला पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उसने दिलेले ६०० रुपये परत करत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्याने मित्राच्या छातीत चाकूने भोसकून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आशीष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. राहुल राजेंद्र जवंजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जवंजाळ हा मुळचा अमरावती येथील रहिवासी आहे. तो पुण्यात एकटाच राहतो, तर आशीष मगर हा मावशीकडे राहतो. दोघेही पूर्वी एका बीपीओमध्ये काम करत होते. तीन महिन्यांपूर्वी ती नोकरी सोडून ते झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागले.
८ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मणिपाल हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन आला. राहुल जवंजाळ याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याबरोबर असलेल्या आशीष मगर याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, राहुलचा फोन आला होता. त्याने सांगितले की, ‘अर्जंट रूमच्या खाली ये, मला लागले आहे.’ त्यामुळे मी रूमच्या खाली गेलो. त्यावेळी त्याच्या मानेजवळ जखम झाली होती. त्यातून रक्त येत होते. त्याला दवाखान्यात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आशीष मगर याच्या या सांगण्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलीस त्याला घेऊन राहुलच्या रूमवर गेले. तेथे गेल्यावर त्याने अगोदर सांगितलेल्या हकीकतीमध्ये बदल केला. आशीषने आता सांगितले की, ते दोघे झोमॅटोवर एकाच गाडीवरून डिलिव्हरीचे काम करत होते. राहुलने त्याला सायंकाळी ६ वाजता फोन करून बोलावून घेतले. आशीष मगर त्याच्या रूमवर गेला. तो बाथरूममध्ये गेला असताना राहुलच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा आशीष वॉशरूममधून बाहेर आला. त्यावेळी राहुल जवंजाळ हा घरातील चाकूने स्वतःच्या छातीमध्ये मारून घेतल्याने रक्त येऊ लागले होते. त्याला अॅक्टिव्हावर मागे बसवून हॉस्पिटलमध्ये जात असताना थोड्या अंतरावर गेल्यावर राहुल बेशुद्ध झाल्याने त्याला रिक्षाने प्रथम निरामय हॉस्पिटल आणि तेथून मणिपाल हॉस्पिटल येथे नेले, असे त्याने सांगितले.
पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅनला बोलावून घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. रक्ताने भरलेले ब्लँकेट आणि टॉवेल जप्त केले. दुचाकीवर रक्ताचे डाग होते. गाडीही जप्त करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुलची आई आल्याने पोलिसांनी शवविच्छेदन केले. त्यात खोलवर जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिले. त्यामुळे आशीष मगर हा सांगत असलेल्या हकीकतीविषयी पोलिसांना संशय वाटत होता.
९ सप्टेंबर रोजी जवळपास दिवसभर पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. शेवटी रात्री उशिरा आशीष मगर याने तिसऱ्यांदा जबाब बदलला. त्यात त्याने खरी हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करीत आहेत.
अशी घडली घटना
आशीष मगर याने सांगितले की, राहुल जवंजाळ याला ६०० रुपये उसने दिले होते. त्याने वेळेत पैसे परत दिले नाहीत. त्याला पैशांसाठी अनेकदा फोन केले. परंतु त्याने फोनला प्रतिसाद न दिल्याने मी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्याच्या खोलीवर गेलो. तेथे आमच्यामध्ये पैशांवरून वाद झाला. तेव्हा राहुल जवंजाळ याने घरातील चाकू घेऊन, ‘‘हातसे क्या मारता है, चाकू से मार’’ असे म्हणाला. तेव्हा मी नाही म्हणत असताना त्याने चाकू माझ्या हातात दिला. राहुलने मला आई-वडिलांवरून शिवीगाळ केल्याने त्या रागाच्या भरात मी तो चाकू राहुलच्या छातीमध्ये जोरात खुपसला. त्यामुळे त्याला जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येऊ लागले. मी घाबरून गेलो. घरातील टॉवेल घेऊन राहुलच्या जखमेवर धरला. त्याला उठवून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जिन्याने चालत बिल्डिंगच्या खाली आणले. त्याच्या अॅक्टिव्हावर बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालो. परंतु, थोड्या अंतरावर तो बेशुद्ध झाल्याने गाडीवरून पडला. तेव्हा गाडी तेथेच सोडून रिक्षामध्ये त्याला घालून प्रथम निरामय हॉस्पिटल येथे नेले आणि तेथून मणिपाल हॉस्पिटल येथे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तो मृत्यू पावल्याचे सांगितले. आशीष मगर याने सांगितलेली हकीकत, घटनास्थळी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि शवविच्छेदनाचा अहवाल यावरून राहुल जवंजाळ याला आशीष मगर याने पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून छातीत चाकू खुपसून जीवे मारल्याचे निष्पन्न झाले.
