आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नोकरीसाठी पोर्तुगालला पाठविण्याच्या नावाखाली महिलेची विक्री

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 8, 2026
Spread the love

पुणे : परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने महिलेकडून ११ लाख रुपये घेऊन तिला पोर्तुगालमध्ये एका बिअर विक्रेत्याला वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने तेथून आपली सुटका करून घेऊन भारतात परत आल्यानंतर आता विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेने या प्लेसमेंट कार्यालयाला सील लावले आहे. या ठिकाणी पोलिसांना २१ जणांचे पासपोर्ट, १०१ करारनामे (अ‍ॅग्रिमेंट) आढळले आहेत.

ही घटना विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथील यूजी-५ या कार्यालयात व पोर्तुगाल येथे १ डिसेंबर २०२५ ते १ जुलै २०२६ दरम्यान घडली आहे.

याबाबत नागपूर येथील एका २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा (सर्व रा. पुणे), तसेच वामसि, चैतन्य, हिम्मतसिंग (सर्व रा. पोर्तुगाल) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील ही महिला इन्स्टाग्रामवर नोकरी शोधत होती. त्यादरम्यान डिसेंबर २०२५ मध्ये यूजी-५, फिनिक्स मार्केटसिटी, ईस्ट कोर्ट, क्लोव्हर पार्क, विमाननगर या कंपनीच्या ‘वई मायग्रेट’ या इन्स्टाग्राम पेजवर मुलांना परदेशात व्हिसा लागल्याने सेलिब्रेशनचा व्हिडिओ दिसला.

त्यांनी संपर्क केल्यावर त्यांना पुण्यात बोलावले. तेथे प्रतिमा भाटी, अजहर शेख, कपिल मिश्रा यांची भेट झाली. प्रतिमा भाटी हिने सुपर मार्केटमध्ये कॅशियर व अकाउंटंट असे जॉब असून दरमहा दीड लाख रुपये पगार, आठ तास काम व आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी, तीन वर्षांसाठी वर्क परमिट असेल, असे जॉब प्रोफाइल सांगितले.

यासाठी ११ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. पैसे दिल्यानंतर त्या २१ मे २०२६ रोजी मुंबई-अबुधाबी-माद्रिद (स्पेन) असा प्रवास करून २१ मे रोजी रात्री स्पेनला पोहोचल्या. तेथील एजंटांनी त्यांना पोर्तुगालला नेले.

तेथे त्यांचा पासपोर्ट हिसकावून घेतला. दोन दिवस रूममध्ये डांबून ठेवले. त्यांच्याकडून ४० हजार रुपये घेतल्यानंतर पासपोर्ट परत दिला.

त्यानंतर एका माणसाबरोबर ओदिमेरा गावात जावे लागेल, असे सांगण्यात आले. तेथे एका घरात दोन मुलींबरोबर ठेवण्यात आले. सुपर मार्केटऐवजी बिअर शॉपीमध्ये काम करायला लावले.

त्यांनी अनिलकुमार याला सांगितल्यावर त्याने स्टुडंट टीआरसी मिळेपर्यंत काम करायला सांगितले. तेथे काम करत असताना अनिलकुमार याने फोन करून शॉपी मालकाला सर्व प्रकारे खुश करावे लागेल, असे सांगितले.

येथील स्थितीबाबत अनिलकुमार याला समजल्याचे मालकाला माहिती झाल्यावर तो फिर्यादीवर चिडला व म्हणाला, “मी प्रतिमा भाटी व त्यांच्या इतर साथीदारांना पैसे देऊन तुला विकत घेतलेले आहे.

तुला इथे नोकरीकरिता पाठविलेले नसून, तुला मी जे करण्यास सांगेल ते तुला करावे लागेल व मला खुश ठेवावे लागेल.” आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यावर तिने आपण तयार असल्याचे दाखवून शॉपी मालकाला बेसावध ठेवले.

त्यानंतर पतीला फोन करून आपली फसवणूक झाल्याचे सांगून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी पहाटे ३ वाजता त्या ठिकाणाहून निघून बसने जांबुजीरा येथे आल्या.

तेथून लिस्बन, माद्रिद (स्पेन) येथे आल्या. त्या दिवशी त्या बसस्टॉपवरच थांबल्या. त्यानंतर ३० जून रोजी रात्री तेथेच असलेल्या होस्टेलमध्ये राहिल्या.

तेथून माद्रिद ते दोहा ते दिल्ली असा विमानाने प्रवास केला. ३१ जून रोजी त्या दिल्लीत पोहोचल्या. त्यांचा पती दिल्लीला आला. तेथून त्या नागपूरला आल्या.

त्यांची मनस्थिती ठीक नसल्याने त्यांनी तेव्हा तक्रार दिली नाही. आता पुण्यात येऊन गुन्हे शाखेत पोलिसांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.