आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भारताच्या तांदूळ निर्यातीमध्ये ५ टक्के वाढ

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 10, 2026
Spread the love

पुणे : जागतिक पातळीवर भौगोलिक आणि राजकीय तणावाची परिस्थिती असतानाही भारताच्या तांदूळ निर्यातीने चांगली कामगिरी केली आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतातून तांदळाच्या निर्यातीमध्ये सुमारे ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत भारतातून ११.६८ दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती, तर यावर्षी ही निर्यात वाढून १२.२७ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे.

जागतिक तांदूळ निर्यात बाजारपेठेत भारताचा वाटा सुमारे ४० टक्के असून, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या प्रमुख निर्यातदार देशांशी भारताची स्पर्धा आहे.

या देशांच्या तुलनेत भारतीय तांदळाचे दर जागतिक बाजारपेठेत तुलनेने कमी असल्याने भारताला निर्यातीमध्ये मोठा फायदा होत आहे.

देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त उत्पादन उपलब्ध झाल्याने अतिरिक्त तांदूळ निर्यात करण्याची संधीही भारताला मिळाली आहे. यंदाच्या निर्यातीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत झालेली वाढ.

जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत सुमारे ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. बांगलादेश, आफ्रिका, कॅमेरून आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये भारतीय बिगर-बासमती तांदळाला मोठी मागणी राहिली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देशात तांदळाचे चांगले उत्पादन झाले. देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतरही अतिरिक्त उत्पादन उपलब्ध असल्याने निर्यातीला चालना मिळाली.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या तांदळाचे दर थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानच्या तुलनेत स्पर्धात्मक राहिल्याने भारतीय तांदळाला चांगली मागणी मिळाली.

एकीकडे बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली असताना, बासमती तांदळाच्या निर्यातीत मात्र सुमारे ५ टक्क्यांची घट झाली आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत भारतातून सुमारे ३.७ दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात झाली.

बासमती तांदळाची मोठी बाजारपेठ असलेल्या सौदी अरेबिया, इराण आणि इतर देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा मागणीवर परिणाम झाला.

त्यामुळे या देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी कमी झाल्याने निर्यातीवरही त्याचा परिणाम झाला. मात्र, बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे एकूण तांदूळ निर्यातीत ५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

जुलै २०२६ पासून मात्र तांदूळ निर्यातदारांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, कार्गो आणि कंटेनर उपलब्धतेची समस्या गंभीर बनली आहे.

काही महिन्यांपूर्वी एका शिपमेंटसाठी सुमारे १,५०० ते २,००० डॉलर खर्च येत होता. आता हाच खर्च वाढून सुमारे ७,००० ते ७,५०० डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

मालवाहतुकीच्या वाढलेल्या खर्चामुळे परदेशी व्यापाऱ्यांना भारतीय तांदळाची खरेदी करणे महाग पडत आहे. परिणामी अनेक व्यापारी नवीन ऑर्डर देण्यास टाळाटाळ करत आहेत.

कार्गो उपलब्ध नसणे आणि उपलब्ध कार्गोसाठी तिप्पट किंवा त्याहून अधिक दर आकारले जाणे, ही निर्यातदारांसाठी मोठी अडचण ठरत आहे.

भारताला जागतिक तांदूळ बाजारपेठेतील आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर वाढलेल्या मालवाहतूक खर्चावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

देशातील अतिरिक्त तांदूळ उत्पादन वाया न जाता त्याची निर्यात होणे गरजेचे आहे. त्यातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते तसेच या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात रोजगारही अवलंबून आहे.

निर्यातदारांना पुरेशा प्रमाणात कार्गो आणि कंटेनर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत. मालवाहतुकीचे दर नियंत्रणात आणण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पुढील काही महिने ही परिस्थिती कायम राहिल्यास भारताच्या तांदूळ निर्यातीच्या उद्दिष्टावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. थायलंड, पाकिस्तान आणि व्हिएतनामसारख्या देशांशी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा कायम ठेवण्यासाठी बासमती आणि बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी कार्गोची उपलब्धता वाढविणे आणि मालवाहतुकीचे दर तातडीने कमी करणे आवश्यक आहे, अशी माहिती जयराज ग्रुपचे निर्यातदार धवल शाह यांनी दिली.