ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून केला खून
सांगलीतील टेंभू कॅनॉलमध्ये मृतदेह दिला फेकून : आंबेगाव पोलिसांनी केली तिघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वारजे माळवाडी येथील ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे आंबेगाव येथून अपहरण करून त्यांना सांगली येथे घेऊन जाऊन त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह कडेगाव येथील टेंभू कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
गोविंद माधवराव उपासे (वय ५९, रा. तपोधाम सोसायटी, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तातोबा ऊर्फ वैभव अर्जुन केंगार (वय २८, रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), राहुल राजेंद्र बाबर (वय २५, रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), रोहन जयसिंग सावंत (वय २३, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रोहित गोविंद उपासे (वय ३५, रा. तपोधाम सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद उपासे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. सध्या ते काही करत नव्हते. गोविंद उपासे हे ९ ऑगस्ट रोजी रात्री मित्रांसोबत जेवण करण्यासाठी धायरी येथील महादेवनगर येथे गेले होते. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता त्यांना कोणाचा तरी फोन आला. त्यावेळी सोबतच्या मित्रांना ‘बाहेर जाऊन येतो’, असे सांगून ते त्यांच्या दुचाकीवरून निघून गेले. गोविंद उपासे पुन्हा परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांचा मुलगा जयवंत याला याबाबत सांगितले. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गोविंद उपासे यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
१२ ऑगस्ट रोजी सांगली शहर पोलिसांना सांगलीतील शामरावनगर येथील घोड्याच्या तबेल्यात काही जणांचे भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सांगली शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गोविंद उपासे यांचे अपहरण करून त्यांना सांगलीत आणल्याचे सांगितले. तसेच, मारहाण करून त्यांचा मृतदेह कडेगाव येथील कॅनॉलमध्ये टाकून दिल्याचे सांगितले. त्यांची दुचाकी आंबेगाव येथे लावली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
गोविंद उपासे यांचा शोध घेत असताना कडेगाव येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती नांदेड सिटी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी दुचाकी लावलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, तिघे जण गोविंद उपासे यांना चारचाकी वाहनातून घेऊन जाताना दिसून आले. त्यानंतर हा गुन्हा आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून करण्यात आला असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
